स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून जबरी चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक, २ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर: येथील मुरगुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेला सोन्याचे मंगळसूत्र आणि दागिने जबरी चोरीचा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (LCB) अवघ्या काही दिवसांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरीचे सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोपेड दुचाकी असा एकूण २,१४,५७४/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २७ जून २०२६ रोजी सकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास, मौजे अर्जुनवाडा ते हळदी रोडवर (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील नारायण सातवणेकर यांच्या विहिरीजवळ फिर्यादी महिला फिरायला गेल्या होत्या. दरम्यान, चॉकलेट रंगाच्या स्कूटीवरून आलेल्या दोन अनोळखी इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या चोराने फिर्यादी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणी मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून हिसका मारून चोरून नेले होते. या प्रकरणी मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नंबर २६४/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०९(४), ३(५) प्रमाणे दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य ओळखून कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या समांतर तपासाचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व त्यांच्या पथकाने तपास सुरू केला.
तपास सुरू असतानाच, हे संशयित आरोपी काळ्या रंगाच्या मोपेडवरून कोल्हापूर विमानतळ परिसरात येणार असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ३ जुलै २०२६ रोजी कोल्हापूर विमानतळ परिसरात सापळा रचून प्रज्वल नागेश आकुर्डे (वय २३, रा. पिंपळगाव खुर्द, ता. कागल, जि. कोल्हापूर) आणि प्रविण अशोक चौगुले (वय २१, रा. बौद्धनगर, निपाणी, ता. निपाणी, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक) दोन आरोपींना ताब्यात घेतले: आरोपींची कौशल्यपूर्ण चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून खालील मुद्देमाल जप्त केला आहे:
ही कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल (भा.पो.से.), अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पो.उ.नि. संतोष गळवे, पोलीस अंमलदार महेश खोत, विशाल चौगुले, संदिप बेंद्रे, सागर माने, लखनसिंह पाटील, महेश पाटील, विजय इंगळे, रोहित मर्दाने, संजय कुंभार, अमित सर्जे, सुशील पाटील व सागर चौगुले यांच्या पथकाने केली आहे.




